Et Cetera

आजीचं गाणं…!

लपतात पण लाजत नाहीत
चावतात पण दिसत नाहीत
चिरडावे तर सापडत नाहीत…
ढेकूण फार झालेत…

चिरडलेच तर वाढतात
आपलेच रक्त काढतात
सगळे कपडे फाडतात
ढेकूण फार झालेत…

पेस्ट कंट्रोलवाले येतात 
उपाय सारे करून जातात 
निलाजरे विषही पचवितात
ढेकूण फार झालेत…

परोपजीवी इकडून तिकडे वाहतात
आपला आकडा वाढवत राहतात
बारमाही पर्वणीत पवित्र नाहतात
ढेकूण फार झालेत

घरालाच चूड लावावी का?
आपलेच संचित जाळावे का?
संस्कृतीची जळमटं काढावी का?
ढेकूण फार झालेत…

झटकून सारी धूळभरली सीटं 
घासावी एकदा व्यवस्था नीट
विवेक बाणवावा धीट
ढेकूण फार झालेत… 

आमच्या आजीची काही आवडती बोलगाणी होती. कुणी लिहिली होती माहित नाही. आम्ही नातवंडांनी तिच्याच तोंडून ऐकली आणि आमच्या लक्षात राहिली तशी इतरांना ऐकवली. त्यात एक गाणे ती मोठ्या तन्मयतेने गात असे… ‘बाबा, ढेकणाने मजला पिसाळले…!’

आज, इतक्या वर्षांनंतरही ढेकणांच्या त्रासातून आपली पूर्णतः सुटका झालेली नाही याचे वैषम्य आणि आजीला होणारा त्रास जाणवल्याने हे लिहावेसे वाटले. याचा नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुकींशी दुरान्वयानेही संबंध नाही आणि तो तसा भासला तर निव्वळ योगायोग समजावा…!

शुभम भवतु !

Leave a comment