Collective Wisdom

प्रज्ञा…!

जनक राजाच्या शास्त्रार्थ सभेत देशभरातल्या वेदशास्त्रसंपन्न प्रकांड पंडितांना एकापाठोपाठ एक नामोहरम करित, शेवटी उरलेल्या याज्ञवल्क्य ऋषींना, जीवन-मृत्यूच्या पलीकडे ब्रह्मलोकाच्या पार जाऊन प्रश्न विचारणाऱ्या विदुषीवर याज्ञवल्क्य संतापले. जनक राजाने मध्यस्थी करून याज्ञवल्क्यांना आपल्या चुकीची जाणीव करून दिल्यावर याज्ञवल्क्यांनी विदुषीची माफी मागितली आणि आपले गुरुत्व स्वीकारण्याची विंनती केली. तथापि याज्ञवल्क्यांसारख्या महर्षींना आपले शिष्य नव्हे तर सहचर बनविण्याच्या विचाराने विदुषीने त्यांना विवाहाचा प्रस्ताव दिला. 

मित्र ऋषींची कन्या तीच ही मैत्रेयी ! जेंव्हा याज्ञवल्क्य ऋषींनी परम ज्ञानाच्या प्राप्तीकरिता साधना करण्यासाठी सर्वसंग परित्याग करून संन्यास घेण्याचे ठरविले तेंव्हा त्यांच्या संपत्तीतील आपला वाटा त्यांची प्रथम पत्नी कात्यायनी हिला देऊन ज्ञानसाधनेसाठी त्यांच्याबरोबर संन्यास घेणे जिने निवडले तीच ही मैत्रेयी!

   बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीच्या शास्त्रार्थ संवादाचे विस्तृत वर्णन येते. त्यात  “आत्मस्व” किंवा आत्मा या विषयावरचा संवाद संपवून, याज्ञवल्कय मैत्रेयीला सांगतात:

हे मैत्रेयी, माणसाने खरोखर पाहावे, ऐकले पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि आत्म्याचे मनन केले पाहिजे; ज्याने स्वतःला पाहिले, ऐकले, चिंतन केले आणि समजून घेतले – त्याच्याद्वारेच सर्व जग ओळखले जाते.

—  बृहदारण्यक उपनिषद २.४.५ब 

ख्यातनाम हिंदी साहित्यकार बुद्धिनाथ मिश्र म्हणतात, “आपल्या संस्कृतीत स्त्रीला पुरुषाच्या अर्धांगिनी बरोबर सहधर्मीणी – धर्माच्या मार्गावर जोडीने चालणारी देखील मानले आहे. पश्चिमेच्या इतिहासकारांनी भारतीय महिलांबद्दल लिहिले की त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मैत्रेयीचे जीवन त्यांची ही मांडणी खोटी ठरविते. ऋग्वेदाच्या १० पेक्षा जास्त ऋचा लिहिणारी आणि भारतीय दर्शनशास्त्राच्या अद्वैतासह शेकडो सिद्धांतांना प्रस्थापित करणारी मैत्रेयी सार्वकालिक भारतीय महिलांच्या प्रज्ञेचे प्रारूप आहे!”

Leave a comment