Collective Wisdom, Et Cetera, Sustainability

विकास…!

सुमारे ६ वर्षांपूर्वी उद्योगांचे सामाजिक दायित्व [Corporate Social Responsibility] हा विषय अभ्यासत असतांना, मानसशास्त्र विषयाच्या एका वर्गात आम्हाला जाणिवांचे संशोधन आणि संज्ञान-विकसन [Cognizance Development] या अंतर्गत एक कृती-कार्यक्रम [Class Activity] दिली होती. यात आम्हाला विविध कृष्णधवल तथा रंगीत छायाचित्रे देण्यात आली आणि त्यातून आम्हाला एक विकास [Development] दर्शविणारे आणि दुसरे ज्यातून विकासाला असणारी आव्हाने [Challenges to Development] प्रतीत होतील अशी दोन प्रातिनिधिक चित्रे निवडण्यास सांगण्यात आली आणि प्रत्येकाने आपापल्या ज्ञान-भान-जाण-जाणिवांना अनुसरून निवड केली.

मी निवडलेली दोन चित्रे अनुक्रमे अशी होती – विकास प्रतीत करणारे मी निवडलेले कृष्णधवल चित्र होते – करड्या अवकाशाच्या पार्श्वभूमीवर आपल्याच लयीत संथपणे विहार करणारा पांढराशुभ्र पक्षी आणि विकासाला आव्हान दर्शविणारे माझे रंगीत चित्र होते – यात्रेतला माणसांनी खचाखच भरलेला आणि वेगाने गरगरणारा महाकाय आकाशपाळणा! अर्थातच आमच्या निवडीमागचा आमचा विचार स्पष्ट करण्याचे बंधन आम्हाला होते आणि माझे विवेचन असे होते –

ज्या अवकाशामध्ये प्रत्येक जीव म्हणजे कुठलाही सजीव हा कुठल्याही भीती, दबाव, उपचार तथा गतानुगतिक रूढीग्रस्ततेपासून मुक्त आणि इतर कुणाशीही तुलना किंवा स्पर्धा न करता, संपूर्ण जाणीवेने आपल्या ‘स्वयम्’शी प्रामाणिक राहून आपल्याच विशिष्ट शैलीत स्वच्छंद पण जबाबदार विहार करू शकेल असा कुठलाही अवकाश माझ्या दृष्टीने ‘विकसित’ [Developed] म्हणता येईल आणि तो तसा होण्यास आणि राहण्यास जी रचना अथवा जे प्रारूप [Social Structure] कारणीभूत ठरेल आणि त्या अवकाशाची धारणा करेल तोच विकास [Development]! तपशीलातील बारकाव्यामध्ये, करडी पार्श्वभूमी ही कायमच कुठल्यातरी अनिष्ट, अनीतीचे मळभ भरून राहीलेल्या आभाळाच्या परिस्थितीचे, सभोवतालचे सूचन होते तर पांढराशुभ्र पक्षी हा चिखलात उगविणाऱ्या कमळाचे, निष्कलंक अलांच्छित चारित्र्याचे प्रतिमान म्हणून निवडले होते.

तर यात्रेतील महाकाय, स्वत:च्या अक्षाभोवती भिरभिरणाऱ्या आकाशपाळण्याचे रंगीत चित्र हे आजच्या बहुरंगी, बहुढंगी, चंगळवादी आणि क्षणिक सुखाच्या नादात सतत भिरभिरत राहणाऱ्या अत्याधुनिक जीवनशैलीचे प्रतिबिंब होते. अशा जीवनशैलीच्या मोहात गुंतून पडल्याने, स्वत:भोवती जाळे विणून त्यातच अडकून पडणाऱ्या कोळ्याचे जिणे आपण जगतो आहोत याचेही भान नसल्याने, धावण्यातच कैफ शोधण्याच्या अट्टाहासापायी आपण केवळ गरगर फिरतोय पोहचत कुठेच नाही हे मुळात समजतच नाही आणि समजले तरी उमजायला जो अक्षम्य उशीर होतो – तो जाणीवेचा अभाव, प्रच्छन्न अनास्था हेच खऱ्या, सर्वसमावेशक आणि धारणाक्षम (शाश्वत नव्हे; इंग्रजी शब्दांचे मराठीकरण करतांना भाषेचा तर राहू दे साधा अर्थाचा देखील विवेक न बाळगल्याने ‘Sustainable’ चे मराठीकरण ‘शाश्वत’ होते जे फारतर ‘Eternal’ चे ‘मुक्त भाषांतर’ असू शकते, असो!) विकासाला आव्हानं असू शकते.

हा स्वत:च्या नादात, स्वत:च्या वेगात आणि स्वत:च्याच मस्तीत स्वत:भोवतीच गोलगोल फिरणारा, स्वमग्नतेचा प्रतिक असलेला पाळणा क्षणभरसुद्धा थांबविणे महाकठीण तेथे तो उलटा फिरविणे म्हणजे तर काळाचे चक्र मागे फिरविण्याइतके वेडगळपणाचे – दिवास्वप्न किंवा कविकल्पना का म्हणानात! हे माणसानेच माणसाच्या भ्रामक विकासाच्या कल्पनांनी खऱ्या, समग्र विकासापुढे उभे केलेले आव्हान… जे फक्त माणसाच्या संवेदना जाग्या आणि जाणीवा समृद्ध झाल्याशिवाय स्वीकारताही येणार नाही, आधुनिक उपायांनी ते निर्दाळणे तर केवळ अतर्क्य आणि अशक्य!

माझ्या या ‘निरुपणा’शी सहमत होणे तेव्हा देखील तेथील उपस्थितांपैकी कुणालाही अर्थातच जड गेले असणार आणि असल्या कविकल्पनांशी तादाम्य पावण्याइतका अव्यवहारी तात्विक मुर्खपणा करण्यापेक्षा त्या आकाशपाळण्याची, रोमारोमात भिनणारी आणि तनमन धुंद करून टाकणारी, ‘आजकल पांव जमींपर नहीं पडते मेरे…’ अनुभूती देणारी सैर कुणालाही अधिक प्रिय वाटली तर दोष कुणाचा…?

आज हे सारे आठविण्याचे कारण म्हणजे… करोना आणि नववर्ष! करोनाने तो पाळणा काही काळ थांबवला हे तर नक्की. बऱ्याच लोकांना या ‘निष्कर्म कर्मयोगा’च्या काळात अनेक साक्षात्कार झाले, उपरत्या झाल्या आणि हृदयाला वित्त… आपलं रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या संकुचित झाल्यामुळे विरक्तीचे झटकेही आले. एक वेळ अशीही आली की आता हा पाळणा खरोखरीच उलटा फिरायला लागतो की काय अशी शंका येण्याइतपत आध्यात्मिक निरासक्ती आणि संतुलित जीवनाचे महत्व याच्या पर्वतप्राय लाटा उठतांना दिसल्या पण लशीची चाहूल लागताच त्यांना भरतीच्या दुप्पट वेगाने ओहोटीही लागलेली दिसली.

नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि येऊ घातलेल्या लशीच्या भरवशावर बहुतांनी गतसालावर आगपाखड करून घेतली. बऱ्याच लोकांनी Sunday सिनेमातील कथाबीजानुसार गेले वर्ष आपल्या आयुष्यात आलेच नव्हते [Zero Year] असे समजून पुढील मार्गक्रमणा करण्याचा निर्णय घेऊन अत्यंत विद्वत्ताप्रचुर संयमाचे प्रमाण दिले! तर कुणी अजूनही करोनाने दिलेल्या दणक्यातून सावरण्याचा प्रयत्न करता आहेत. काही उदासीन संत प्रभृती या, ‘ठेविले अनंते तैसेची रहावे…’ या साक्षीभावाने साऱ्याच घटनाक्रमाकडे निरिच्छ आणि ‘इदं न मम…’ धारणेने पाहता आहेत तर काही होतकरू उद्योजक ‘संधी’चे सोने करण्याच्या उद्योगात मग्न आहेत…

या सगळ्या गोंधळात, करोनाने दिलेले धडे नववर्षाच्या संकल्पांसारखे अल्पजीवी ठरू नये ही अपेक्षा ठेऊन आणि साऱ्याच करोना-योध्यांप्रती कृतज्ञता बाळगून पुन:पुन्हा एकच प्रश्न ‘मना’ला छळत राहतो… पाळणा पुन्हा वेग पकडतोय… यावेळी त्याची गतीही वाढली आणि आकाशाची सफर करण्याची माणसाची लालसाही वाढत राहिली…

तर…?

नववर्षाच्या विवेकपूर्ण शुभेच्छा…!

1 thought on “विकास…!”

  1. खूपच सुंदर विचार व चित्रा चे सुंदर विश्लेषण
    तुमच्या कडून चित्र कसे वाचायचे हे समजले खूपच सुंदर।।।।

    Like

Leave a comment