Et Cetera

आख्यान…! 

विनासायास सुखासीन झालेल्या लाभार्थ्यांनी
पापाचे वाटेकरी होण्यास साफ नकार दिल्यावर
नरकद्वाराचे भय अन स्वर्गारोहणाच्या आमिषाने
वाल्याचा वाल्मिकी करणाऱ्या सहज योजनेची
अखंड नामजप मंत्ररुपी कळ लीलया फिरवणाऱ्या
स्वामीनिष्ठ ठेकेदारांची नीतिमत्ता आणि
स्वत्वासाठी जपलेला बाणेदारपणा

तथा…

हातून घडलेल्या चुकीची शिक्षा म्हणून मिळू शकणाऱ्या
शापाला घाबरून पापाचे परिमार्जन करण्यासाठी
आपापल्या सत्वपरीक्षेने साध्य न होऊ शकणारे फळ
पातिव्रत्याचे सत्व पणास लावून मिळवू पाहणाऱ्या वीरांना
तिच्या क्षणिक भाळण्याचे लांच्छन वाटून घेणारी
सत्वगुणी राजपुत्रांची न्यायप्रियता आणि
दैवी मायेच्या उपयोगीतेचा भावार्थ…

…एवढाच आपल्या संस्कृतीचा अर्क

आणि

‘जाणता राजा’च्या आणि
‘भाई’च्या बड्डे सेलिब्रेशनमध्ये
फरक करता न येणे
हा आपल्या परंपरेचा तर्क असेल

तर…

संदर्भ मुळापासून तपासायला नकोत…?

Leave a comment