Et Cetera

हितगुज…?

पूर्वी लोक पत्र लिहीत असत, पत्र म्हणजे अर्धी भेट मानत. आम्ही अजूनही लिहितो अधून मधून, खूपच उचंबळून आलं की. खूप भरून आलं की भरभरून व्यक्त व्हायला लागतं. तिथे हे मेसेज वगैरे अगदीच बिनकामाचे आणि ते व्हॉटसअॅप वगैरे तर फारच कुचकामी. एकतर खूप सारं बोलायला लागतं किंवा लिहायला तरी, तेव्हाच मोकळं वाटतं. पण मुद्दा तो नाही, मुद्दा आहे पत्र. पत्र हा लेखनप्रकार साहित्यात मोडत नसला तरी समाजमनाच्या जडणघडणीत आपली जागा (आणि आब) राखून आहे. अगदी अब्राहम लिंकनच्या ‘हेडमास्तरांना पत्र‘ पासून थेट माहेरवाशिण बायकोने पुलंच्या ‘असामी’ला धाडलेले छत्रपतींच्या आज्ञापत्राच्या धाटणीचे सूचनापत्र अशी ऐतिहासिक, भावनिक तथा व्यावहारिक परंपरा लाभलेल्या या पत्रलेखनाबद्दल शालेय पाठयक्रमात ‘स्वाध्याय’ नसता तरच नवल.

शाळा सोडतांना शाळा सोडल्याच्या दाखल्याबरोबर स्वाध्यायासह इतरही अनेक गैरसोयीच्या गोष्टी शाळेतच सोडण्याची देखील एक ‘विकसनशील’ परंपरा आहे. जणू काही या गोष्टी आपण आयुष्यभर सोबतीसाठी बरोबर घेतल्या तर शाळेत येणाऱ्या पुढच्या पिढयांची त्यांच्यावाचून आबाळच होईल ! यातील शाळेबरोबरच सोडायच्या दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे – स्वयंशिस्त आणि नागरिकशास्त्र – मुळात दोन्ही ‘स्कोअरिंग सब्जेक्ट्स’ नसल्याने आधीपासूनच ऑप्शनला टाकायची सोय असते अन त्यांची वकिली करायला कुठलेच कोचिंग क्लासेस पुढे येत नसल्याने बिचारे अजूनच अडगळीत पडतात. खरे तर एवढे दोनच विषय नीट समजले आणि अंगी बाणवता आले तर वयाच्या कुठल्याही टप्प्यावर जगातील काहीही शिकणे शक्य व्हावे. पण लक्षात कोण घेतो?

आम्ही केवळ महाविद्यालयात प्रवेश घेण्याची पूर्वअट म्हणून शाळा सोडल्याचा दाखला घेतला, अन्यथा आम्ही आजही मनाने शाळेतच आहोत. यालाच बहुतेक ओल्ड स्कूल मानसिकता म्हणत असावे का? असो. तर त्यामुळे आमच्या पत्रलेखनात चार गोष्टी कालत्रयी बदलल्या नाहीत, अगदी दर २४ तासाला स्टेट्स (पूर्वी हे कमवायला आयुष्य खपवावे लागत असे, म्हणे !) बदलण्याच्या काळातही ! पहिली गोष्ट पानाच्या सर्वात वरती मधोमध II श्री II अशी प्राणप्रतिष्ठा, त्याखाली उजव्या कोपऱ्यात वार व दिनांक, मग डावीकडे समास सोडून मायना आणि सर्वात खाली समारोप करतांना ‘कळावे, लोभ असावा.’ या शेवटच्या तीन शब्दात जे सौहार्द्र सामावले आहे त्यात मानवी संबंधांचे जितके आयाम आहेत तेवढे कुठल्याही अतिप्रगत सोशल नेटवर्कमध्येही सापडणे शक्य नाही. 

यातील ‘लोभ’ (हा मोह-मायेशी संबंधीत ‘हव्यास’ अशा अर्थाचा नसून, मायेच्या आत्मीयता, ममत्व या स्वरुपाचा आहे !) असावा’मध्ये जेवढी मायेची ऊब तेवढाच प्रेमळ अधिकार आणि नात्याची वीण घट्ट ठेवण्याच्या ग्वाहीबरोबर अपेक्षाही, पण ‘कळावे’ मध्ये याहून अधिक बरेच काही…! त्यातील सगळ्यात महत्वाचे म्हणजे निरंतर संवादण्याची आस्था, आपुलकी आणि आग्रह ! केवळ ख्याली-खुशाली किंवा फक्त सुखवार्ताच कळावी म्हणून नाही तर सारेच समाचार समजावे, म्हणून ‘कळावे’ ! मुळात आप्त-स्वकीय स्वजन यांना आपल्या सुख-दु:खात सहभागी करून घेण्यातील समानुभूतीचा उद्गार म्हणजे ‘कळावे’ ! तोरण दारी आणि मरण दारी कार्य असते म्हणून जावे ही जनरीत झाली पण अशा प्रसंगी उपचार म्हणून सारेच जमतात, त्यात व्यवहाराचा भाग अधिक असतो, सौहार्द्र असतेच असे नाही. सौहार्द्र वाढण्यासाठी स्नेह हवा जो कधीच उपचारांच्या अधीन नसतो. स्नेह हा आत्मीयता आणि सहवेदना यांच्या खांद्यावर लहानाचा मोठा होतो आणि संवादाच्या सेतुवरून इकडून तिकडे बागडतो. तोच संवाद निरंतर रहावा म्हणून ‘कळावे’ ! 

याशिवाय ‘कळावे’ यामध्ये अनुस्यूत असते ती पोच… म्हणजे पोचपावती. बऱ्याच जणांना कधी, कुठे, कसे वागावे याची पोच नसते ती निराळी. अलीकडे भ्रष्टाचाराचा शिष्टाचार झाल्यापासून सामाजिक संकेत आणि नीती-नियम इतके बदललेत की वेषभूशेसह बोलण्या-वागण्याची पोच नसणे हे मॉडर्न असण्याचे लक्षण आणि ‘इन थिंग’ असण्याचे दिवस आहेत… ‘ट्रेंडिंग…’ यू नो ! तेही एक असो. तर पोचपावती म्हणजे साध्या शुद्ध मराठीत अॅकनॉलेजमेंट ! तुम्ही मला काही पाठविले ते प्राप्त झाले हे उलटटपाली कळविण्याची नैतिक जबाबदारी. आता यातील ‘नैतिक’ आणखीन ‘जबाबदारी’ या दोन्हीपाशी मिलेनीयल अडखळले तर ती कुणाची सामाजिक जबाबदारी?

पूर्वी बंद पाकिटात पत्र पाठवितांना त्यावर पाठविणाऱ्याचा तपशील ‘प्रेषक’ अशा शीर्षकाने लिहिण्याची पद्धत होती आणि ज्याला उद्देशून पाठविले तो ‘प्रेषित’…  म्हणजे अज्ञ लोकांनी क्रुसावर चढवला तो ईश्वराचा संदेशवाहक नव्हे तर सूज्ञ लोक ज्याच्याशी काही हितगूज करू पाहता तो संदेशग्राहक ! पण माणसांत हल्ली प्रेक्षक आणि पोषित असे दोनच प्रकार शिल्लक असल्याने आणि मुळात पाकीट बंद करण्याचा संस्कार कालबाह्य झाल्याने सारेच कसे उघड उघड चालते. व्यवस्था ज्याचे पोषण करते तो पोषित आणि तो जो काही तमाशा दाखवेल तो टाळ्या पिटत उघड्या डोळ्याने निष्क्रियपणे बघणारे ते प्रेक्षक ! व्यवस्थेला याहून अधिक (विचार-)विनिमयाची अपेक्षा नाही कारण विचारापेक्षा प्रचार आणि संभाषणापेक्षा भाषण अधिक प्रभावी ठरते असा सत्योत्तर अनुभव सांगतो. आणि प्रचार आणखीन भाषण या दोन्ही प्रकारांना चर्चा, विचारांचे आदान-प्रदान यांचे वावडे, त्यांना हवा फक्त श्रोता ज्याच्या फास्ट लोकलला श्रवण आणि भाषण यांच्या मध्ये अध्ययन, चिंतन, मनन असल्या बिनकामाच्या छोट्या छोट्या स्टेशन्सचा अडसर नसेल.

दूरदर्शनवर अलीकडे एक नवीन जाहिरात दिसू लागली आहे. ८ करोंड हून अधिक गाणी ऐकण्याची ‘सोय’ असल्याने, कानाला ‘श्रवणयंत्र’ लावलं की आजूबाजूला काय घडते आहे याचा त्रास करून न घेता स्वत:च्या मनोरंजनात मग्न राहण्याच्या ‘सुविधे’ची. स्वमग्नता, जो कालपरवापर्यंत एक मनोविकार मानला जात असे, आज त्याचा व्यापार होतो आहे आणि तुम्हाला जन्मत: या विकाराचा ‘लाभ’ झाला नसेल तर नाराज व्हायचे कारण नाही, तुम्ही तो विकत घेऊ शकता ! अत्याधुनिक उपकरणांमध्ये न्यूक्लिअर मिसाईल्सपेक्षाही विघातक आविष्कार जर कशाचा असेल तर तो आहे या ‘श्रवणयंत्र’ अर्थात हेडफोन्सचा. भौतिक प्रगतीच्या नादात आधीच पराकोटीच्या स्वकेन्द्रित झालेल्या माणसाला या आयुधाने केवळ स्वमग्नच नाही तर सभोवतालाप्रति अविचलीत (वाचा: बधीर) करण्याचे मोठेच क्रांतिकारी काम केले. याची तुलना होऊ शकणारे दुसरे एकमेव ‘साधन’ म्हणजे लाऊड स्पीकर अर्थात भोंगे ! महाराष्ट्राच्या ‘राज’कारणात तूर्तास हा विषय फारच तापलेला असल्याने त्यावर जास्त वाच्यता नको, चटके बसायचे. तथापि, ऐकायला हेडफोन्स आणि लाऊड स्पीकर परस्परविरोधी वाटत असले तरी, मानवी प्रज्ञेचा बुद्धिभेद करून विचारक्षमता कुंठित करणे आणि माणसाचा तमस वाढविणे या उद्देशाबाबत दोन्ही उपकरणांचा एकच सूर लागतो !

कुठलाही मोठा बदल, विशेषत: मानवी संबंधात, हा केवळ दोनच पद्धतीने होता असा एक समज आहे – उत्क्रांतीतून किंवा क्रांतीतून – बाय इव्होल्यूशन ऑर बाय रिव्होल्यूशन. उत्क्रांतीचा मार्ग जाणीवेतून येतो म्हणून सहसा शाहणीव देतो. जगण्याची, सभोवतालाची समज समृद्ध करतो तर क्रांतीचा मार्ग बहुदा उणीवेतून येतो. नवनवीन उपकरणांचे शोध, माध्यमक्रांती यामागे कुठल्या उणिवा दडलेल्या आहेत याचा जाणीवपूर्वक शोध घेतला तर बऱ्याच अकल्पित गोष्टी समजू शकतील. उर्जेचा शोध लागल्यापासून माणसाने झपाट्याने प्रगती केली आणि तंत्रज्ञानाने विकासाचा वेग महाविद्युल्लतेपरी वाढविला. माणसाने कोटीच्या कोटी (अक्षरश:) उड्डाणे घेऊन मागच्या ३०० वर्षात पार केले नव्हते एवढे अंतर गेल्या तीस-चाळीस वर्षात पार केले.

या प्रवासात अनेक कालबाह्य आणि कुचकामी थांबे मागे पडले. फास्ट लोकल्स बिनमहत्वाचे स्टेशन्स वगळू लागल्या. डांबराचा गुणधर्म अंगाखांद्यावर बाळगणारे आणि रंगरंगोटीने सजलेले टोलधारी उन्नत महामार्ग वाटेतल्या गावखेड्यांशी फटकून वागू लागले. पूर्वी गावाच्या पोटातून जाणारे मार्ग आता खालच्या वस्तीशी ओळखदेख न ठेवता उड्डाणपूलांच्या मार्गे परस्पर डोक्यावरून पसार होऊ लागले. गंतव्यस्थानाला पोहचण्याची घाई ‘वाढता वाढता वाढे…’ अशी नित्य वर्धिष्णू राहिल्याने पळती झाडे मागे पडून ‘बायपास’ची संख्या ऑर्गनाइज्ड पद्धतीने वाढू लागली.

अशा जीवघेण्या वेगामुळे ‘डरके आगे जीत है…’वाले थ्रील मिळत असेल तर मिळो बापडे पण आधी ‘डर’च मिळतो हे जाहिरातीलाही नाकारता येत नाही. भय घालवण्याचा सर्वकालिक रामबाण उपाय म्हणजे साथ – सोबत. लहानपणी भुतांच्या गोष्टी ऐकल्या की आधी लघुशंका लागायची आणि मग लघुशंकेलाही सोबत लागायची. ‘कुणीतरी आहे तिथं…’ची भीती घालवण्यासाठी ‘कुणीतरी आहे सोबत…’ यासारखा धीर नाही. मोठेपणी या ‘कुणीतरी’च्या भयाची जागा भविष्य म्हणजेच उद्याच्या काळजीने घेतली आणि उद्याबद्दलची अनिश्चितता आज अनेक व्यसनात दिलासा शोधू लागली. एका मोठ्या आणि उद्योगी समुदायाला निरुद्योगी करण्याची ‘आयडिया’ व्यावसायिकांना सुचली आणि संकटातही संधी शोधणाऱ्या राजकारण्यांना त्यात बरेच लाभार्थी दिसू लागताच रोज दीड जीबीचा रतीब सुरू झाला.

दोन पायावर तोल साधणे जमल्यामुळे पाठीचा कणा ताठ होऊन मोकळ्या झालेल्या ज्या हातांनी माणसाने स्वत:ची सृष्टी निर्माण केली त्या हातांना एका मामुली उपकरणाने स्थानबद्ध केले. मोठ्या मिनतवारीने शिकून सवरून अंगठेबहाद्दराचा बोरूबहाद्दर झालेल्या माणसाचा पुन्हा अंगठेबहाद्दर व्हायला एक जेमतेम विशीतली कोवळी ‘माध्यम’-क्रांती पुरली. एकेकाळी समाजप्रिय असणारा मनुष्यप्राणी, वेळेअभावी प्रत्यक्ष भेटून सुरेल बैठक जमविण्याऐवजी समाजमाध्यमाचे माध्यम होऊन बे(भे)सूर झुंडशाही करण्यात धन्यता मानू लागला. अंगठ्यासह हाताच्या पाचही बोटांच्या सर्जनशीलतेचा, त्यांनी मिळून बनणाऱ्या मुठीच्या सामर्थ्याचा माणसाला पडलेला विसर एकवेळ क्षम्य मानता आला असता परंतु त्याबरोबरीने संकुचित मानसिकतेने विचारांना पडलेल्या मर्यादा, विवेकाचा जाणीवपूर्वक केलेला त्याग आणि क्षुद्र, तत्कालिक स्वार्थासाठी केवळ नियतीशीच नाही तर येणाऱ्या पिढ्यांसह संपूर्ण सृष्टीशी केलेली तडजोड याला कसे माफ करावे ?

हे असे का झाले याची चिकित्सा करता अनेक कारणे सापडतील. पण साऱ्याचे मूळ मात्र एकच – भय, असुरक्षितता, अस्थिरता. प्रगती मध्ये गती अनुस्यूत असल्याने जेवढ्या वेगाने प्रगती होईल त्याच्या कित्येक पट वेगाने जगण्याची गती वाढेल हे ओघाने आलेच. आज जगण्याची स्पर्धा आणि त्यामुळे गती इतकी भयाकारी झाली आहे की ज्यासाठी सगळी उठाठेव चालली आहे ते चलन जरी खिशातून पडले तरी थांबून ते उचलण्यापेक्षा तेवढ्या वेळात त्याहून जास्त कमवणे शक्य असल्यास तेवढाही खोळंबा माणसाला नको आहे, ठहराव, उसंत, निवांतपणा यांची तर बातच नको. अशा परिस्थितीत हितगुज-चर्चा अशा निरर्थक उद्योगांपेक्षा आपल्याच भ्रामक जगात रमणे कधीही सोपे आणि सोईस्कर !

विठ्ठलाच्या प्रेममय वर्णनात रममाण झालेल्या स्त्री रुपकातील माऊली जेव्हा,
शब्देविण संवादु दुजेवीण अनुवादू। हे तव कैसेनि गमे II
परेहि परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेनि सांगे II

म्हणतात तेव्हा त्यांना, ‘मी, माझे, मला’ यात आकंठ बुडालेल्या माणसाने दुसऱ्याशी हृदयापासून संवाद साधण्याऐवजी मनाची सारी कवाडे बंद करून भलत्याच अर्थाने अंतर्मुख होणे अभिप्रेत नाही. अशा उफराट्या आध्यात्माच्या मार्गावर एकटे पडणे ही संतांचे लक्षण तर नाहीच पण समर्थांना मूर्खाचे आणखी एक लक्षण सापडल्याने नवा (उ)दासबोध लिहिण्याचे निमित्त मात्र ठरू शकते.

तात्विक किंवा अध्यात्मिक राहू दे, अगदी न्यूटनचा तिसरा संपूर्ण शास्त्रीय नियम सुद्धा क्रियेला प्रतिक्रिया गृहीत धरतो, मग संवादामध्ये सादेला प्रतिसाद गृहीत धरण्याचा संकेत हा शास्त्रीय का मानू नये ? हाकेला ओ देण्याची पद्धत पशुपक्ष्यांमध्येसुद्धा आढळते तर अतिप्रगत माणसाला आपल्या प्रगत असण्याचा टेंभा मिरविण्यासाठी भलत्याच अर्थाने उदासीन रहावेसे का वाटावे? आधुनिकतेच्या अति हव्यासापोटी फाटक्या कपड्यांची फॅशन व्हावी तद्वत माध्यमांच्या अतिरेकी वापरात संवादाची लक्तरे निघाली तरी चालतील? साधनक्रांतीने ‘शब्देविण संवादु’ची भलतीच सोय करून दिलेली असल्याने, प्रतिसादाची अपेक्षा न धरता ‘डबल ब्ल्यू टिक’वर समाधान मानावे? रिकाम्या गाभाऱ्याला ‘भाव तेथे देव’ म्हणत मनोभावे नमस्कार करावा आणि आपली भक्ती पोहचली, अनुग्रहाची सक्ती नाही एवढाच साऱ्याचा भावार्थ?

बाकी, वैभव म्हणाला तेच खरे… तुम्ही व्हॉटसअॅपवर आहात ना, तर मी तुमचा आहे!

तळटीप: उपरोक्त लिखाणात हनुमान जयंतीच्या निमित्ताने, हनुमान चालीसा नाही तरी, मारुतीस्तोत्रातील काही वचनांचा चपखल वापर सूज्ञ वाचकांस आढळेल… आम्हीही आस्तिकच आहोत याचा दाखला…!

शुभम भवतु !

Leave a comment