Et Cetera

कालत्रयी…

सत्य, तत्व, नीती, निष्ठा
साऱ्यांशी तडजोड करून उभारलेल्या
संपत्तीच्या भिंतीला समृद्धीचे लिंपण करून
त्यावर ठोकलेली अस्तित्वाच्या भीतीची खुंटी
टांगायला गैरसोयीच्या गोष्टी…

उदाहरणार्थ,
समता, निरपेक्षता, तर्क, विवेक… इत्यादी
आणि झालंच तर त्यांची महापुरुषरुपी प्रतीकेही…
…काळ-वेळ बघून त्यांच्याकडे पाठ फिरवायला.

दुसरी खुंटी, बाजूलाच…
सत्य आणि असत्याच्या खिळ्यांनी ठोकलेली
‘बातमी’च्या जोरावर जगणाऱ्या ‘सत्योत्तरा’ची…
या खुंटीवर अडकवलेल्या सोन्याच्या साखळीचे
दुसरे टोक गळेपट्ट्यात…

केवळ धन्याच्या सुरक्षेसाठी रात्रंदिन दक्ष राहून
दिलदार धनिकाची सोय पाहता पाहता
आपल्याही उदनिर्वाहाची सोय पहाणाऱ्या आणि
एरवी डोळे मिटून बकध्यानात तंद्री लावणाऱ्या
इमानी पाळीव प्राण्यांप्रमाणे…

अडचणीच्या गोष्टींचे अस्तित्वच नाकारण्यासाठी
दोन्ही डोळे मिटून घेणाऱ्या भाविकांना पडतोय
विसर त्यांच्या आराध्य दैवताच्या तिसऱ्या नेत्राचा
रुद्राच्या तांडवाची परिसीमा अशा प्रतिकाचा…

‘मौनं सर्वार्थ साधनं’ची सोय नसते सेवकरूपी सम्राटाला
मार्गक्रमण करावेच लागते मानगुटीवरच्या समंधासह
‘तू बोला, मैं चला…’ची पंचवीस आवर्तने चुकत नाहीत
आणि मौनात राहून डोक्याची शंभर शकले होणे अटळ
अशा समयी गोष्टी सांगीन युक्तीच्या चार हाच आपत्धर्म

…पण कितीही त्रासदायक वाटला तरी
वेताळच आपला तारणहार आहे याचा
विसर पडू नये विक्रमादित्याला,
कालत्रयी…

Leave a comment