Et Cetera

उमेद…!

आज जगाला भेडसावणाऱ्या करोना विषाणूच्या भीती संदर्भात काल माझ्या इत्यादी ब्लॉगवर ‘इष्टापत्ती‘ या पोस्टद्वारे मी कास्ट अवे या हॉलीवूडच्या चित्रपटाची मीमांसा केली. ते लिखाण म्हणजे या विषयाचा उपोद्घात होता असे मानले तर आजचा हा लेख उपसंहार आहे असे मानायला हरकत नाही. तर पुढे…

‘कास्ट अवे’ मधला ‘चक नोलॅण्ड’ जेव्हा निर्मनुष्य बेटावर जागा होतो आणि काय घडलं, आपण कुठे आहोत याचे भान आल्यावर, आपल्या बरोबर वाहून आलेल्या सामानात काही उपयोगाच्या वस्तू सापडतात का याची चाचपणी करतो तेव्हा त्याला अनेक पार्सल्स सापडतात. त्यातील एक सुस्थितीतील पार्सल आता ईप्सित स्थळी पोहचणे शक्य नसल्याने ते पाठवणाऱ्याला परत करण्यासाठी तो सांभाळून ठेवतो.

माणसात परतल्यानंतर ‘चक’ला समजते की बराच काळ त्याचा थांगपत्ता न लागल्याने त्याला मृत गृहीत धरून सगळ्यांचे, त्याच्या शिवायचे, आयुष्य पुढे सरकलेले असते आणि त्याच्या मैत्रिणीने लग्न करून संसार थाटलेला असतो. दोघात अजूनही प्रेम शिल्लक असले तरी आता तिला तिचा नवरा आणि मुलगी यांचे बंधन असल्याने ती ‘चक’ला त्यांच्या प्रेममयी स्मृतींची साक्षीदार असलेली मोटार तेवढी देऊ शकते!

दुसरे करण्यासारखे काही नसल्याने, ‘चक’ ते पत्त्यावर पोहचू न शकलेले पार्सल त्याच्या प्रेषकाला परत करायला पोहचतो तर दाराला कुलूप! पार्सल तिथेच ठेऊन तो परत निघतो आणि एक चौरस्त्याला संभ्रमित अवस्थेत थांबतो. समोरून आलेल्या गाडीतील स्त्री त्याला चारही रस्ते कुठे जातात याची माहिती पुरवते आणि ती जेव्हा त्यातील एका रस्त्याला लागते तेव्हा ‘चक’ला तिच्या गाडीच्या मागे तेच चित्र दिसते जे त्या पार्सलवर होते.

‘चक’ थोडा वेळ विचार करतो आणि सस्मित चेहऱ्याने त्या गाडीच्या मागे नव्या उमेदीने जाऊ लागतो!

या क्लायमेक्स चे विडंबन म्हणून ‘फेडेक्स’ने आपल्या दूरदर्शनसाठीच्या जाहिरातीत हा शेवट असा दाखविला –  ‘चक’ जेव्हा त्या स्त्रीच्या घरी पोहोचतो तेव्हा तिला उत्सुकतेपोटी ते पार्सल उघडायला सांगतो. ती स्त्री त्याच्यासमोर ते पार्सल उघडून त्याला दाखवतांना सांगते, ‘विशेष काही नाही हो, यात एक सॅटेलाइट फोन, एक जिपीएस लोकेटर, एक फिशिंग रॉड, एक वॉटर प्यूरिफायर आणि धान्यांच्या बिया अशा वेडगळ वस्तू होत्या. नाही पोहचल्या म्हणून फार काही बिघडलं नाही, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ!’

हे ऐकल्यावर ‘चक’चा चेहरा एवढा चमत्कारिक का झाला हे त्या बाईला कसे कळावे..?

‘तुझे आहे तुजपाशी…’ हेच विसरल्याने आपण भरकटतो, नाही का? करोनाचा हाच संदेश तर नसेल..?

बोधकथा:

अकबराकडे एक मौल्यवान अंगठी होती. त्या रत्नजडीत हिऱ्याच्या अंगठीवर अकबराला काही कोरायचं होतं. नेहमीप्रमाणे त्या मजकुराला अट होती. ती अशी की सुखसमाधानात किंवा दु:खविपदेत कुठल्याही परिस्थितीत ते वाचले तर मनाला दिलासा तर मिळावाच पण विवेक आणि उमेद दोन्ही जीवंत रहावी.

अशा अवघड आव्हानांचा स्वीकार करून त्याला यथायोग्य परिमाण आणि परिणाम देण्यात ख्यातकीर्त असणाऱ्या चतुर बिरबलाच्या कानावर नेहमीप्रमाणे ही बातमी गेली आणि त्याने बादशहा अकबराला त्या अंगठीवर कोरून घेण्यासाठी केवळ ३ जादुई शब्द सुचविले –

‘हेही दिवस जातील!’

सुख-दु:ख, ऐश्वर्य-दारिद्र्य, समाधान-विषाद, आनंद-वैफल्य, उत्साह-नैराश्य, भोगाभोग येतील आणि जातील. या अशाश्वत जगात दोनच गोष्टी शाश्वत आहेत – जन्म आणि मृत्यू. पण त्या दरम्यान जे घडते तेच जीवन आणि ते सार्थकी लावण्यासाठी दोन गोष्टी कधीही सोडून चालणार नाही – विवेक आणि उमेद!

चला तर मग, जगाला भेडसावणाऱ्या ‘करोना’चा विवेकाने सामना करून उमेद जीवंत ठेऊ या उरलेल्या जगण्याला नव्याने सुरवात करू या…? शुरुआतका कोई अंत नहीं…

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडवा आणि नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!

Leave a comment