Et Cetera

कोSहम…!

आत्मशोधाची प्रक्रिया, कोSहमचे उत्तर शोधणे आपण समजतो तसे नसते, असू शकत नाही. माझ्यातला मी म्हणजे काही ‘माझी दहाची नोट…’ नव्हे जी मागच्या दिवाळीला घातलेल्या ठेवणीतल्या कुर्त्याच्या खिशात राहून जावी. बरे, मी हरवलो आहे का? तर कुठेतरी ठेवली गेली असायला व्यक्ती म्हणजे काही किल्ली नव्हे आणि ‘आपण यांना पाहिलंत का?’ मध्ये फोटो झळकावा अशा अर्थानेही आपण काही खरतर हरवलेले नसतो. खरा, माझ्या मूळच्या स्वरूपातला मी हा आत खोल असतोच. पण लहानपणापासून इतरांची माझ्याबद्दलची मतं, त्यातून मी काढलेले चुकीचे निष्कर्ष आणि माझ्या पक्क्या झालेल्या किंवा करवून दिल्या गेलेल्या धारणा, माझ्यावर घडलेले संस्कार यांच्या ढिगाऱ्याखाली मी गाडलेला असतो. त्यामुळे आत्मशोध म्हणजे खरतर हा ढिगारा उपसून काढणे आणि त्याच्याखाली, आत, खोल कुचंबलेल्या स्वत:पर्यंत पोहचणे. चुकीच्या धारणा, प्रसंगोपात संस्कार आणि अनावश्यक ज्ञान खोडून काढून मूळ मानसावर जगाने ओतलेला ढिगारा उपसून हे आठवणे की हे सर्व घडण्यापूर्वी तुम्ही कोण होतात… म्हणजे आत्मशोध!

येथे बुद्धीवर, चित्तावर, जाणीवांवरच काय प्रज्ञेवर असेदेखील म्हटलेलं नाही… ‘मानसा’वर, मनावर असे म्हटले आहे. याचे कारण बुद्धी निरपेक्ष असते, चित्त स्थायी असते, जाणीवा विकसनशील असतात तर प्रज्ञा स्वयंभू असते. मन उधाण वाऱ्यासारखे चंचल असले तरी या सगळ्यांवर स्वार होऊन या सगळ्यांना आपल्याला हवे तसे वाकविण्याइतके, नाचविण्याइतके समर्थही असते. म्हणूनच समर्थांनी देखील उपदेश बाकी कुणाला न करता मनाला केला… ‘मना सज्जना भक्ती पंथेची जावे…’ कारण मनात उठलेले तरंग आणि मनावर साचलेले मळभ हे सर्वस्पर्शी आणि दूरगामी असते. मनात उमलणाऱ्या भाव-भावनांचे उर्जेत रुपांतर होऊन ती प्रत्यक्षात अनुभवता येते याच्या दाखला देणाऱ्या कथा जशा इतिहासात सापडतात तशा वर्तमानातही आपण अनुभवत असतो. मनाची – शरीरशास्त्राच्या परिभाषेत ‘अतिंद्रिय’ – शक्ती ही अत्यंत प्रभावी आणि परिणामकारी असते. त्यामुळे मन नावाचं हे इंद्रिय कुठल्याही एक्सरे, एमआरआय किंवा ग्राफीमध्ये सापडत नसले आणि त्याचे वास्तव्य, भावनेच्या दृष्टीकोनातून हृदयात आणि शरीरशास्त्रानुसार मेंदूत असल्याने, प्रकट स्वरुपात दाखवता येत नसले तरी त्याचे अस्तित्व, प्राबल्य आणि महत्व हे पदोपदी, क्षणोक्षणी जाणवत असते हे कुणीही नाकारू शकत नाही.

अशा या अदृश्य पण सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, निर्गुण नसलं तरी निराकार अवयवाच्या मशागतीसाठी, विकासासाठी आपण काय योजना आखतो? आजची मुले ही उद्याचे युवा आहेत आणि त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहून समाजात मान-मरातब, प्रतिष्ठा मिळवावी, जबाबदार नागरिक व्हावे याबरोबर एक संवेदनशील, सहजीवनावर श्रद्धा असणारी प्रजाती असावे म्हणून आपण काय प्रयत्न करतो? मुलांच्या शारीरिक विकासासाठी कॉम्प्लान आणि बौद्धिक विकासासाठी शंखपुष्पी देणाऱ्या त्यांच्या आया भावनिक, मानसिक विकासासाठी काय देतात? मोबाईल, टीव्हीचा रिमोट आणि कॉम्प्यूटर… उच्च प्रतीच्या ‘नॉईस कॅन्सलिंग’ हेडफोनसह? असे हेडफोन्स बाहेरच्या आवाजांपासून त्यांची ‘सुटका’ करतांनाच त्यांचा ‘आतला’ आवाजही दाबून टाकतात आणि त्यांच्या ‘हेड’मध्ये ‘फोनी’ गोष्टी भरतात या वास्तवाचा स्वीकार आपण, ‘ॲलोपथीच्या सोप्या आणि झटपट उपचारांना थोडेफार साईड इफेक्ट्स असणारच..’, अशा संभावित कोडगेपणाने केला आहे का? आणि अशाच गोष्टींचा ढिगारा वाढत गेल्याने त्याखाली दबलेल्या ‘मी’चे ‘स्वयं’ बद्दलचे भान हरवते याची आपल्याला किंचित तरी जाणीव आहे?

गांधीजींनी सात सामाजिक पापे किंवा दुष्कर्मे सांगितली – कार्यविहीन संपत्ती, विवेकशून्य सुखोपभोग, चारित्र्यहीन बुद्धीमत्ता, नितीमत्ताशून्य व्यवसाय, माणुसकीहीन विज्ञान, त्यागाशिवाय धर्म आणि तत्वहीन राजकारण! यामध्ये अजून एकाची भर घातली की आजच्या युगातील समग्र जगण्याचे सार समजण्यास मदत होईल… संवेदनाशून्य विकास!

आजच्या अत्याधिक आत्मकेंद्री आणि भौतिक समृद्धीच्या अवडंबराने पछाडलेल्या प्रगतीच्या प्रारूपाने, मूल जन्माला येण्याआधीपासूनच त्याच्या अत्यंत पूर्वनियोजित आणि पूर्णपणे नियंत्रित ‘घडणी’च्या प्रक्रियेने माणूस घडविणे बंद करून यंत्रे घडवायला सुरवात केली आहे. यंत्र हे माणसापेक्षा अधिक स्मार्ट, अधिक एफिशियंट आणि अधिक प्रॉडक्टीव्ह असते तशी आजची पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा अधिक स्मार्ट, एफिशियंट आणि प्रॉडक्टीव्ह आहे हे निश्चित… अडचण एवढीच आहे की यंत्रे सहज बिघडतात किंवा बिघडवता येतात जेणेकरून त्यांच्या बाजारमूल्यावर घसारा (डेप्रीसीएशन) क्लेम करून त्यांना रिप्लेस करता येते… तेवढी तयारी ठेवली म्हणजे बाकी ‘ऑल इज वेल…!’

हं, आता काही विवेक शाबूत असलेल्या लोकांना… मनुष्य प्रजाती येत्या शंभर वर्षांपलीकडे देखील टिकावी अशी इच्छा असेल, ‘माणूस’ घडविण्याच्या आणि ‘माणुसकी’ टिकविण्याच्या प्रक्रियेत रस असेल, हे जग आहे त्याहून सुंदर करण्याचा ध्यास असेल आणि जैवविविधता तथा सहजीवनाची आस असेल… त्यांनी भौतिक आणि लौकिक विकासाबरोबर ‘मनोविकास’ आणि आयक्यू बरोबरच इक्यू, सिक्यू आणि एस्क्यूच्या विकासाचा देखील नक्की विचार करावा… अन्यथा, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ हे मनुष्य प्रजातीचे विधिलिखित ठरणे अटळच दिसते!

सावध! ऐका पुढल्या हाका

Leave a comment