Et Cetera

अन्वयार्थ…!

जगाच्या आर्थिक उत्क्रांतीची आणि पर्यायाने माणसाच्या उपभोग्यतेची परिसीमा मानली जाणारे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या मनुष्य व्यवहाराच्या परस्परपूरक आधुनिक आयामाने माणसाचा ग्राहक झाला… खरतर ‘उपभोक्ता’ झाला असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरावे! समृद्ध मानवी मूल्यांची जागा क्षुद्र बाजारमूल्यांनी घेतली आणि माणसाच्या जन्मापासून मृत्युपर्यंत साऱ्याचाच बाजार झाला. नव्हे, जन्माआधीपासून म्हणजे अगदी डोहाळे लागण्यापासून तर मृत्युपश्चात अगदी पुनर्जन्मापर्यंत, साऱ्याच सामान्य नैसर्गिक घटनांचे आधी ‘डेव्हलपमेंट’ आणि यथावकाश ‘इव्हेंट’ झाले आणि इव्हेंट हे जेवढे साजरे करण्यासाठी असतात तेवढेच ‘मॅनेज’ करण्यासाठीही. आज ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ हा मोठाच व्यवसाय आहे, किंबहुना हा एकच प्रचलित व्यवसाय आहे ज्याच्या अनेक उपशाखा आणि पाळेमुळे आहेत. तो कधी शिक्षणाच्या आवरणात येतो, कधी खेळांच्या मैदानावर धुरळा उडवतो, कधी वैद्यकातही डायग्नोस होतो तर कधी राजकारण म्हणून लोकशाही मार्गाने आपली धोरणे राबवितांना सापडतो.

भटके आणि विमुक्त मानव समूह स्थिरस्थावर झाले आणि कृषी व पशुपालनापासून आर्टीफिशियल इंटेलिजन्स ते मशीन लर्निंग व्हाया हयुमन रिसोर्स अशा विविध स्तरावर उत्क्रांत आणि प्रगत होत आपणच रचलेल्या सापळ्यात बंदिस्त होत गेले. विकास या संकल्पनेचा विपर्यास आणि कडेलोट तेव्हाच झाला जेव्हा पहिल्या माणसाने आपल्या दीर्घकालीन फायद्याच्या तरतुदीसाठी निसर्गाची हेळसांड केली आणि आपल्याच बांधवांचा बळी देण्यास मुळीच मागेपुढे बघितले नाही. ज्या दिवशी दुधात पाणी मिसळण्याची ‘युक्ती’ माणसाला सुचली त्या दिवशी सचोटी अनाथ झाली आणि ज्या दिवशी प्रस्थापितांनी निवडकांच्या फायद्यासाठी कुठल्याच खिजगणतीत नसलेल्यांना विस्थापित केले त्या दिवशी सद्सद्विवेकबुद्धीने शेवटचा आचका दिला.

आज माणसाचा उपभोक्ता अर्थात कन्झ्युमर झाल्यामुळे आयडिया-प्रॉडक्शन-डिलिव्हरी-कंझमशन आणि डिस्पोजल असे दुष्टचक्र मार्केटिंग अर्थात विपणन या केंद्रबिंदूभोवती अत्यंत वेगाने फिरत असल्याने माणसासह प्रत्येक गोष्ट, अगदी निसर्गसंपदा आणि पृथ्वीभोवतालचा अवकाश सुद्धा, मार्केटेबल अर्थात विक्रीयोग्य कशी होईल यासाठी माणसामाणसात अहमहिका लागली आहे. चिरंतन मानवी मूल्यांची जागा क्षणभंगुर बाजारू मूल्यांनी घेतल्याने एकाचा ग्राहक झाल्यावर दुसरा विक्रेता होणारच. माणसाच्या इमानालाही ‘प्राईस टॅग’ लागल्याने सवंग लोकप्रियतेच्या शिखरावरच वास्तव्य असणाऱ्या हिंदी चित्रपटांनी, ‘पगार बढाओ, ये पुलीसवालेका पगार बढाओ तुम. इतना पैसामे घर नही चलता साला इमान कैसे चलेगा…’ असे एका डॉनच्या तोंडून पुलिस कमिशनरला ऐकवून नीतीमत्तेचे खच्चीकरण, गुन्हेगारीचे वर्चस्वीकरण आणि पैशाचे उदात्तीकरण एका फटक्यात केल्याने भारतासारख्या व्यक्तीपुजेचे अनाठायी स्तोम असलेल्या देशात बारा महिने चोवीस तास चालणाऱ्या गल्लाभरू ‘चित्रपट’ नावाच्या ‘संस्कारवर्गा’त स्वैर संवादलेखकांच्या टाळ्याबाज संवादांनी आणि झिंगाट गीत-संगीतकारांच्या ठेकेबाज स्वैराचाराने जे संस्कार तरुण पिढीवर होतायत त्याची ना कुणाला तमा आहे ना फिकीर. निर्माते-दिग्दर्शक तर कोटीच्या कोटी उड्डाणे आणि देशोदेशीचे प्रतिष्ठित महोत्सव या पलीकडे पाहूच शकत नसल्याने आपल्या अंगणातली पिढी देशोधडीला लागली तरी कुणाला त्याचे सोयरेसुतक नाही अशी परिस्थिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमक्या कुठल्या ‘रिफॉर्म’चा समाजमन ताळ्यावर आणण्यास उपयोग होईल ही बाब केवळ शोचनीयच नाही तर अतिशय चिंतनीय देखील आहे.

आज हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे केरळ मध्ये झालेला ‘देवाचा कोप’ अनुभवल्यानंतर आणि माळीण आणि कोकणच्या निमित्ताने ‘अस्मानी’ बरोबरच ‘दे माय धरणी ठाय’ संकटाची चुणूक बघितल्यानंतरही आपण नेमका काय बोध घेतला हे आज महाराष्ट्रासह देशाच्या अन्य भागातही ओढवलेल्या भीषण पूर परिस्थितीने सिद्धच आहे. बदलेल्या पर्यावरणामुळे असंतुलित पर्जन्यमानावर ठपका ठेवणे केव्हाही सोपे! ही पूरपरिस्थिती उद्भविण्याची कारणे आणि तिचे अल्प तथा दीर्घकालीन दुष्परिणाम यावर दूरदर्शनीय चर्चा झडतील, चौकशी समित्या नेमल्या जातील, त्यांचे यथावकाश आलेले ‘सुधारित’ अहवाल कपाटबंद होतील आणि मनुष्यसमूहाच्या भावना जशा संवेदनशील असतात त्याहून कित्येक पटीने स्मृती अल्पकालीन आणि अधू असते या ‘नैसर्गिक’ न्यायाने सारे अघटीत विसरले जाईल आणि जगणे पूर्वपदावर येईल, काश्मीरमध्ये आले तसे!

या सर्व भीषण परिस्थितीचे ‘राजकारण करू नका’ असे सांगण्याचेही बरेच राजकारण झाले आणि कुणा एका अत्यंत लोकप्रिय मालिकेच्या कलाकारांना देखील या पूरस्थितीचा फटका बसल्याने नवीन भागांचे (वि)चित्रीकरण न होऊ शकल्याने त्या मालिकेच्या चाहत्या वर्गाला काही जुनेच भाग पहावे लागण्याने एका मोठ्या वर्गाचा विरस होऊन रसभंगाच्या भीषण संकटाचा सामना करावा लागल्याचेही समजते. या सर्व प्रकारात एक छोटासा तपशील असाही सांगण्यात आला की या पूरसंकटाला माणसाशिवाय इतरही अनेक प्राणी बळी पडले आणि ते बळी पडले याहून मोठी समस्या अशी होती की त्यांची विल्हेवाट लावली नाही तर प्रचंड रोगराई पसरण्याचा धोका आहे. यावर तातडीने कार्यवाही होणे हे रास्तच पण त्या मुक्या जनावरांच्या मृत्यूस कोण कारणीभूत होते आणि त्यांना ‘न्याय’ कसा मिळणार याचा छडा कुणी आणि कसा लावायचा?

या निमित्ताने इथे एक शास्त्रीय तथ्य सांगणे समर्पक ठरावे. कीटक प्रजातीतील मुंग्यांपासून मधमाश्यांपर्यंत, पक्ष्यांमधील चिमणीपासून गिधाडांपर्यंत आणि प्राण्यांमधील सापापासून सिंहापर्यंत कुठलीही प्रजाती नष्ट झाली तर पृथ्वीवरील जैविक साखळीचा आणि पर्यायाने येथील परिसंस्था अर्थात इकोसिस्टीमचा तोल बिघडतो आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीच नष्ट होण्याची प्रक्रिया सुरु होते. याउलट मनुष्य प्रजाती नष्ट झाली तर पर्यावरणाचा, परिसंस्थेचा आणि पर्यायाने सृष्टीची धारणा करणाऱ्या निसर्गातील जैविक साखळीचा बिघडलेला समतोल पूर्ववत होईल आणि ही जल, जमीन, जंगल या संपदेने नटलेली सृष्टी अधिकच बहरेल, फळेल, फुलेल. ब्रह्मांडाचा अथांग पसरलेला पसारा हा मानवकेंद्रित आहे या भ्रमात मग्न असणाऱ्या क्षुद्र मानवास जागे करून त्याच्या अल्प मतीस ठिकाणावर आणण्यास एवढे एकच तथ्य पुरावे! स्वत:ला जैविक साखळीचा सर्वोच्च स्वामी, अनभिषिक्त सम्राट समजणाऱ्या माणसाची किमंत निसर्गाच्या दृष्टीने एका सूक्ष्म किटकाएवढी देखील नाही कारण मनुष्य प्राणी निसर्गाच्या अत्यंत संतुलित परिसंस्थेचा भाग होऊन जगणे कधीच विसरला आणि स्वत:चे स्वामित्व सिद्ध करण्याच्या नादात पराकोटीच्या निसर्गविरोधी कृत्यांनी निसर्गशत्रू होऊन बसला.

‘पर्यावरण वाचवा’ किंवा ‘पृथ्वी वाचवा’ असे नारे देणाऱ्या पर्यावरणवाद्यांच्या भावना आणि भूमिकांचा संपूर्ण आदर राखून एक छोटीशी दुरुस्ती सुचवावीशी वाटते, ‘मनुष्य प्रजाती वाचवा’ असे धोरण ठेवा! निसर्ग स्वयंभू, सर्वशक्तिमान, सर्वहारा आहे, त्याच्या रक्षणाची काळजी करण्यापेक्षा स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घ्या; निसर्गाने जड झाले तेव्हा डायनोसोरस संपवले, माणूस काय चीज आहे?

असो. आज देशभरात स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचे उत्सवी वातावरण आहे आणि या वर्षीचा स्वातंत्र्य दिन हा ‘खरा’, ‘दुसरा’ किंवा ‘परिपूर्ण’ असल्याचे दाखलेही बरीच उत्साही मंडळी देत आहेत. माणसाच्या मूल्यसंस्था आणि वैचारिक परीघ जोवर सत्ताकेंद्रित आहे आणि पैसा किंवा चलन या व्यवहाराच्या ‘चलना’लाच ‘साध्य’ समजण्याच्या मानसिकतेचा प्रादुर्भाव सर्वदूर आणि खोलवर रुजलेला आहे तोवर प्रादेशिक स्वातंत्र्याचा कुणीही कितीही डंका पिटला तरी वैचारिक पारतंत्र्यातून माणसाची मुक्तता नाही हे दशांगुळे व्यापून उरणारे सत्य, तथ्य आणि अन्वयार्थ… पोस्ट-ट्रुथ नव्हे!

कुणीही मनुष्य प्राणी स्वत:ला तेव्हाच स्वतंत्र मानू शकतो जेव्हा तो आपल्या आचार-विचार-आहार-विहारातून नैसर्गिक जीवनशैलीचा केवळ पुरस्कार नाही तर अवलंब करतो. आपले स्वत:चे विचार हे कुठल्याही ‘स्कूल-ऑफ-थॉट’कडून उधार न घेता आपल्या स्वत:च्या तर्कसुसंगत विश्लेषणाने पक्के करतो. कुणाच्याही अनुनयापेक्षा स्वत:च्या अनुभवावर निर्णय घेतो आणि त्यावर ठाम राहतो. कुठल्याही प्रवाहाच्या लाटेवर स्वार न होता प्रवाहाच्या उगमाचा, उद्दिष्टांचा आणि उपसंहाराचा निष्पक्ष अभ्यास करून त्याविषयी निरपेक्ष मत बनवून आपली भूमिका ठरवतो, निर्भयपणे व्यक्त होतो. मनुष्य जन्माचे सार्थक होण्याच्या दूरदृष्टीने आपली कर्मे निवडतो आणि त्यायोगे मिळणाऱ्या सर्व इष्ट-अनिष्ट फळांची जबाबदारी घेतो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण या जगात आलो त्यापेक्षा हे जग अधिक सुंदर, संपूर्ण, समृद्ध आणि समर्पक करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आपले स्वीकृत कार्य आपल्यानंतरही तेवढ्याच, किंबहुना अधिकच, कटिबद्धतेने अखंड चालू राहील याची काळजी घेतो. अशाच मनुष्यास खऱ्या अर्थाने स्वतंत्र म्हणवून घेण्याचा आणि आपले निखळ, निरपेक्ष आणि नी:स्सीम स्वातंत्र्य जोपासण्याचा, मिरविण्याचा आणि साजरे करण्याचा नैतिक अधिकार असतो.

आज स्वतंत्र भारताचा ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा करतांना आपण अशा एका सर्वार्थाने मुक्त आणि, व्यक्तींसह अभिव्यक्तींचे आणि वृत्तींसह प्रवृत्तींचे स्वातंत्र्य अबाधित राखणाऱ्या, दुसऱ्यांच्या भावनांची कदर आणि मताचा आदर करणाऱ्या, गुरुदेवांच्या स्वप्नातल्या खऱ्या अर्थाने संपूर्ण स्वतंत्र भारताच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्धार करू या!

या प्रकटनास आणखी एक निमित्त पुरविणारा डॉ. आनंद नाडकर्णी यांचा त्यांच्या मनोगती ब्लॉगवर प्रकाशित झालेला अत्यंत विचारप्रवर्तक लेख इथे वाचा.

शुभम भवतु !

Leave a comment